रम्य होती ती पहाट, कोवळे दव शिंपले सूर होते शांततेचे, नभ गुलाली लिंपले प्रित होती आसमंती, अंतरी मन दाटले चाहूल ती होती कुणाची, काय होते योजले शोधती आतुर डोळे, स्पंदनी आभास जो तर्क सारे खुंटले, अंतरी विश्वास तो कोण गीत सुचले असे, मन मनाशी गात होते चित्र भोवतीचे गुलाबी वेगळ्या तालात होते प्रीत माझ्या कल्पनेची, रेखिली पटलावरी मम कथेची नायिका, उतरेल का धरणीवरी ध्येयवेड्या त्या पहाटे, ध्यास मजला लागला सप्तसुर होतेच कळले, आठवा मज साधला ©️विजयकुमार पानसरे