Skip to main content

Posts

विद्युल्लता

तळपत तरळत प्रचंड गर्जत गर्द कभिन्न नभास छेडत स्थूल शांतता पायी तुडवत जन मनाचा कंप उडवत खट्याळ सारे खेळ खेळत आभाळातून भुईस बरसली शून्यातून अस्तित्व उभारून अंधाराला क्षणात फोडून कालीचा अवतार घेऊन अनंतशक्ती गळ्यात लेऊन शिवतांडव प्रत्यय घडवून प्रलयशलाका सूक्ष्म दाहून आकाशातून पुन्हा प्रसवण्या भूमीच्या गर्भात विसावली शांत झाली... ©विजयकुमार पानसरे
Recent posts

तू

प्रगट सामोरी उभी कधी तू कधी स्वप्नातली सखी तू आभास कधी तुझा सुखाचा कधी कविता लता कधी तू शांत तजेली उषा कधी तू कधी हुरहूरणारी संध्या तू निर्मळ शीतल छाया कधी तू जगावेगळी माया तू तू रेशमाचा बंध हवासा गुंफणारी माला कधी तू कधी झुळूक तू वाऱ्याची दरवळणारा सुगंधही तू   दवबिंदू तू पर्णा वरचा सूक्ष्म त्यातली सृष्टी तू मधुर सुधारस तू फुलांचा त्यावर मोहक पाखरु तू भास मनीचा श्वास जीवाचा सहवास हवासा फक्त तू आणि तू!! ©विजयकुमार पानसरे

द्वंद्व

सांज होती पांगलेली, जर्द गुलाबी थोडी वणवा फुलवून डोईवर, नभ स्तब्ध उभे होते  ती तशी स्वतःच्या धुंदी, रंगत असता रानी ते शांतपणे प्रहराची, घटिका मोजत होते तिला तसे पहाताना, मोहरले मनी ते क्षणिक सारे आहे, हे ते जाणुनी होते पक्षांच्या सुरावटी अन्, कवायती सुरेल गंभीर वड सावलीचे, चंचल नाजूक वेल प्रवासी खट्याळ एक, झरा खळखळणारा सुगंध मोगऱ्याचा, मोहक दरवळणारा   थंड वाऱ्या सोबत, अलगद शब्द कुणाचे कोणी दूर तपस्वी योगी, चिंतन करी ईशाचे रम्य पाहता देखावा, रसिक ते मोहीत झाले नभ सांजेसोबत आता, रमले.. शांत झाले कोर घेऊनि हाती, अलगद रजनी आली  तारका पांघरुनी, धरा चांदण्यात न्हाली!! ©️विजयकुमार पानसरे

आठवण

मन खिन्न पुन्हा असे धाव घेई वेडे पिसे आठवांच्या वाटेवर लख्ख ताजे कवडसे एक एक गोष्ट जशी  नुकती घडून गेलेली एक एक फुल जसे आताच उमलून आलेले ©️विजयकुमार पानसरे

आशा

शोभावे दिस पुन्हा, ऊन सावल्यांनी भिजावे मन पुन्हा, चिंब चांदण्यानी सरावी उदासी, ल्यावा चैतन्याचा नूर मातीमोल सारा स्वार्थ, यावा मायेला बहर ओसरावा सर्व काठ, पुन्हा जीवन फुलावे देव घेऊन मस्तकी, लोका आनंदे डुलावे निवळाव्या साऱ्या चिंता, सुख पुरून उरावे लाख पाखरांचे थवे, उंच आकाशी उडावे दूर वाटेतले खोडे, व्हावे जीवन प्रवाही सुटतील सारी कोडी, जरी उरलीत काही व्हावे मळभही दूर, लख्ख उजेड आकाशी  गीत गाईन नव्याने, गाठ बांधुनी मनाशी ©️विजयकुमार पानसरे

अधांतर

अधांतर काठालगतच्या घाटावरती, बसलो होतो पाय सोडूनि सोडूनि सारे पाप ताप ते, शमवित तेवत विस्तव जो मनी मनी पोकळी सुन्न उदासी, आठवण येई लांब कुणाची कुणीतरी त्या तिरावरती, हाक देतसे बोलावितसे   तिर तिकडचा रम्य हिरवळ, झरे वाहती त्यातून खळखळ खळाळत्या ज़ळी सोडूनि नौका, पुढे सरकण्या त्या तीरावर तिर सोडूनी पुढे चाललो, मध्य गाठला थमलो क्षणभर क्षणेक वळलो आणि पाहिला, सोडला मी जो.. तोही तीर इथून आलो तिथे चाललो, दोन्ही दृश्ये असती समान समान अंतरी दोन्ही तीर हे, मध्यावर मी विराजमान जिथे थांबलो तिथेच खिळलो, अंतरी असे विराट काहूर प्रत्येक विचार वाजवीतसे, कैक विषयांचे ढोल बिगुल मध्य जैसा असे एकटा, मीही एकटा या मध्यावर अवकाशात जैसा ध्रुवतारा, सजे एकटा.. परी अधांतर येणे जगणे रमणे जाणे, असे एकटे सत्य निरंतर मनुष्यप्राणी असे एकटा या मध्यावर या तीरांवर ©️विजयकुमार पानसरे

प्रित

रम्य होती ती पहाट, कोवळे दव शिंपले सूर होते शांततेचे, नभ गुलाली लिंपले प्रित होती आसमंती, अंतरी मन दाटले   चाहूल ती होती कुणाची, काय होते योजले शोधती आतुर डोळे, स्पंदनी आभास जो तर्क सारे खुंटले, अंतरी विश्वास तो कोण गीत सुचले असे, मन मनाशी गात होते चित्र भोवतीचे गुलाबी वेगळ्या तालात होते   प्रीत माझ्या कल्पनेची, रेखिली पटलावरी मम कथेची नायिका, उतरेल का धरणीवरी ध्येयवेड्या त्या पहाटे, ध्यास मजला लागला  सप्तसुर होतेच कळले, आठवा मज साधला ©️विजयकुमार पानसरे