अभ्यास जरा जास्त आहे,
दर पेपर ला वाटतं,
सगळं वाचुन न झाल्याचं,
शल्य मनात दाटतं,
पेपर मधला एकही प्रश्न,
ओळखीचा वाटत नाही,
मनात भीतीशिवाय तेव्हा
कोणीच बोलत नाही,
तितक्यात कोपऱ्यात एक प्रश्न
ओळखीचा दिसू लागतो,
कमी गुणांचा असूनही,
तोच सोबती वाटतो,
मन उनाड मुलासारखे,
रंगवून त्याचे उत्तर लिहिते,
किती वेळ गेला ह्यात,
हे डोक्यात गणित नसते,
सगळे जण पुरवण्या घेऊन,
नेमकं लिहितात का काही,
ह्या प्रश्नाचे उत्तर मात्र,
काही केल्या मिळत नाही,
एक तास उरला असता,
बरच काही आठवू लागतं,
सगळ्या आठवणींचं गाठोडं,
एकाएकी डोक्यात साठत
कोण संवाद कोणामधला,
कविता की धड्यातला,
स्पष्टीकरण आहे पण,
संदर्भ नाठवे कशातला?
कोणी कोणास हरवले,
स्थळ काळ इसवीसन,
भौमितिक प्रमेये आणि
अंकगणित मूल्यमापन
परीक्षा कोणतीही असो,
त्रेधा हीच सगळीकडे,
हाच असावा अर्थ याचा
विषय सर्वथा नावडे !!
आयुष्याचे चढउतार
अनुभवताना एक मात्र वाटते,
तो अभ्यास छान होता
अन पेपरही सोपे होते.
कमी मार्क मिळाले जरी,
फारतर ओरडा बसे,
पोटाला चिमटा बसेल,
अशी भीती मनात नसे!
रम्य ते बालपण, रम्य ती शाळा,
रम्य तो अभ्यास, अन भिंतीवरचा फळा!!!
- विजयकुमार पानसरे
Comments
Post a Comment