अधांतर
काठालगतच्या घाटावरती, बसलो होतो पाय सोडूनि
सोडूनि सारे पाप ताप ते, शमवित तेवत विस्तव जो मनी
मनी पोकळी सुन्न उदासी, आठवण येई लांब कुणाची
कुणीतरी त्या तिरावरती, हाक देतसे बोलावितसे
तिर तिकडचा रम्य हिरवळ, झरे वाहती त्यातून खळखळ
खळाळत्या ज़ळी सोडूनि नौका, पुढे सरकण्या त्या तीरावर
तिर सोडूनी पुढे चाललो, मध्य गाठला थमलो क्षणभर
क्षणेक वळलो आणि पाहिला, सोडला मी जो.. तोही तीर
इथून आलो तिथे चाललो, दोन्ही दृश्ये असती समान
समान अंतरी दोन्ही तीर हे, मध्यावर मी विराजमान
जिथे थांबलो तिथेच खिळलो, अंतरी असे विराट काहूर
प्रत्येक विचार वाजवीतसे, कैक विषयांचे ढोल बिगुल
मध्य जैसा असे एकटा, मीही एकटा या मध्यावर
अवकाशात जैसा ध्रुवतारा, सजे एकटा.. परी अधांतर
येणे जगणे रमणे जाणे, असे एकटे सत्य निरंतर
मनुष्यप्राणी असे एकटा या मध्यावर या तीरांवर
©️विजयकुमार पानसरे
Comments
Post a Comment