सांज होती पांगलेली, जर्द गुलाबी थोडी
वणवा फुलवून डोईवर, नभ स्तब्ध उभे होते
ती तशी स्वतःच्या धुंदी, रंगत असता रानी
ते शांतपणे प्रहराची, घटिका मोजत होते
तिला तसे पहाताना, मोहरले मनी ते
क्षणिक सारे आहे, हे ते जाणुनी होते
पक्षांच्या सुरावटी अन्, कवायती सुरेल
गंभीर वड सावलीचे, चंचल नाजूक वेल
प्रवासी खट्याळ एक, झरा खळखळणारा
सुगंध मोगऱ्याचा, मोहक दरवळणारा
थंड वाऱ्या सोबत, अलगद शब्द कुणाचे
कोणी दूर तपस्वी योगी, चिंतन करी ईशाचे
रम्य पाहता देखावा, रसिक ते मोहीत झाले
नभ सांजेसोबत आता, रमले.. शांत झाले
कोर घेऊनि हाती, अलगद रजनी आली
तारका पांघरुनी, धरा चांदण्यात न्हाली!!
©️विजयकुमार पानसरे
Comments
Post a Comment